अनुदिनी
‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ हे केवळ एका मैदानाचे किंवा परिसराचे नाव नाही तर ते एका संस्कृतीचे, एका अभिरुचीचे आणि एका प्रगल्भ दृष्टीकोनाचेही प्रतीक आहे. प्रतिभांनी बहरलेल्या व्यक्तींच्या वैभवशाली परंपरेचा वारसा या परिसराला लाभला आहे. सुरुवातीला या मैदानाचे नाव ‘माहिम पार्क’ असे होते, १९२५ साली मुंबई महापालिकेने ते जनतेसाठी खुले केले आणि त्याचे नाव ‘शिवाजी पार्क’ ठेवले.
गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ परिसरात कला-क्रीडा- साहित्य व अन्य क्षेत्रांतील अनेकांच्या कर्तृत्वाला बहर आला. या मैदानाने, मैदानाच्या परिसराने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तर अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे महत्त्वाचे क्षण अनुभवले. या परिसरात अनेक हिंदी- मराठी गाण्यांनी जन्म घेतला, लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या अनेक नाटकांच्या निर्मितीचे बेत झाले, महान क्रिकेटपटूंची सानपाऊले इथल्या मातीत उमटली, विनोदाची पखरण झाली, इथल्या घरांमधील आरशांनी अनेकदा अभिनयाचा सराव पाहिला, कुंचल्यांनी व्यंगचित्रे साकारली, सुवर्णालंकारांच्या बेतांना झळाळी दिली, समाजाला दिशा दिली. इतकेच नव्हे तर या परिसरातील काही उपाहारगृहांनाही त्यांच्या ‘रूचकर आणि स्वादिष्ट’ सहवासामुळे एखाद्या प्रिय स्नेह्यांचा दर्जा प्राप्त झाला. एवढी विपुल विविधता एकाच परिसरात गजबजावी, असे भाग्य फार कमी परिसरांना लाभते.
संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एका विराणीमध्ये म्हटलं आहे,
‘अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू, मी म्हणे गोपाळु आलागे माये’
'कुठून तरी अचानक चंदनाचा सुगंध आल्याचा मला भास झाला, नक्कीच गोपाळ मला भेटायला आला असणार.’ आवडत्या आणि एक काळ गाजवून गेलेल्या व्यक्तींच्या आठवणींचा परिमळ आपल्या मनाला असाच चंदनी आनंद देत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरात कधी-काळ वास्तव्य करुन गेलेल्या आणि सध्या राहत असलेल्या निवडक प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाचा, आठवणींचा शब्द दरवळ असलेली ही स्मरणकातर करणारी ‘अनुदिनी’ घेऊन येत आहोत, तीन दशकांहुन अधिक काळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत आणि अग्रेसर असलेल्या सुगी डेव्हलपर्स यांच्या सुगी परिवारातर्फे.
‘विश्वास, सचोटी, चिकाटी आणि पारदर्शकता’ यांच्या बळावर सुगी डेव्हलपर्सचे विश्व विस्तारत आहे आणि ते आज मुंबईतील अग्रगण्य व परिवाराचे विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. निष्पक्ष, प्रामाणिक व्यवहार यातून प्राप्त झालेल्या सद्भावनेमुळेच सुगी डेव्हलपर्सने ‘मुंबई शहरातील सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प विकासक’ आणि ‘पुनर्विकास विशेषज्ञ’ अशी ख्याती प्राप्त केली आहे.
दादर हा मुंबईचा मध्य समजला जातो. दृष्टीसौंदर्य आणि कलात्मकतेचा वसा घेतलेले आमचे काम लोकांपर्यंत पोहोचत आहे. या परिसराशी आमची भावनात्मक नाळ जोडलेली आहे, ती त्याला असलेल्यावै विध्यपूर्ण सांस्कृतिक वारशामुळे. कलाक्षेत्रातील हिरे माणकांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसराला एक वैभवशाली झळाळी प्राप्त करुन दिलेली आहे. या परंपरेचे स्मरण करण्यासाठी आणि तिचे अस्तित्व जपण्यासाठी सुगी कटीबद्ध आहे. ज्या समृद्ध अशा छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आमचे वास्तव्य आहे, त्याचे आम्ही सामाजिक देणे लागतो. हे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून आम्ही ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ याच नावाने विविध कार्यक्रमांची शृंखला गुंफत आलो आहोत. त्याच मालिकेतले हे पुढचे पाऊल. ‘निवास’ म्हणजे केवळ वास्तव्य नसते तर त्या परिसराशी स्वतःचे आयुष्य जोडून घेणे असते, या जाणिवेतूनच ‘सुगी’ हे पाऊल उचलत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात ज्यांच्या प्रतिभा दरवळल्या अशा श्रेष्ठांचे, त्यांच्या महानतेचे स्मरण करीत एक ‘अनुदिनी’ पंधरा दिवसांतून एकदा भेटत ‘शब्द-चित्र’ रूपात प्रवास करणार आहे. परिसर गौरवाचा हा अक्षरसोहळा येत्या २१ ऑगस्ट पासून ‘सुगी’च्या अनुदिनीवर सुरु होत आहे.