‘सुसंस्कृत मराठी माणूस’ या संकल्पनेची व्याख्या करायची असेल तर त्यासाठी जे निकष लावले जातील त्यातील एक प्रमुख निकष असेल, ‘सुधीर फडके यांची गाणी तन्मयतेने ऐकणारी व्यक्ती.’ सुधीर फडके उर्फ बाबूजींचं संगीत आणि स्वर हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग झालेला आहे. बाबूजी म्हणजे स्वरांच्या मैफलीतला एक घरंदाज, शुद्ध आणि सात्विक स्वर. कठोर संघर्षानंतरही त्या स्वरांना कधी कडवटपणाचा स्पर्श झाला नाही आणि अफाट यशाच्या अहंकाराचाही वारा लागला नाही. चित्रपट क्षेत्रातलं यश अनेकदा माणसाच्या मनावर दांभिकपणाचे, दिखाऊपणाचे अलंकार सहजगत्या चढवतो. बाबूजी मात्र अखेरपर्यंत आंतर्बाह्य निखालस, निखळ कलावंत राहिले. त्यांच्या देशभक्तीचे रुपांतर प्रसंगी दाद रा नगर हवेली मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक धाडसात झाले, मात्र कार्यपूर्तीनंतर ते तेवढ्याच सहजतेने पुन्हा संगीतात रमले, एकाहून एक सरस गीतांची निर्मिती करत राहिले.
बाबूजींनी केलेला संघर्ष म्हणजे आयुष्यानं घेतलेली त्यांची कठोर अशी परीक्षाच होती. उपाशी पोटी, अर्धपोटी राहण्यापासून ते रस्त्याच्या कडेला वृत्तपत्रांच्या पानांवर झोपण्यापर्यंतचे कष्ट त्यांनी सहन केले. त्याच वृत्तपत्रांची पाने भविष्यात बाबूजींच्या गुणगानाने आणि कर्तृत्वाच्या वर्णनाने भरुन वाहिली. त्यांच्यासोबत ‘तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ लागले’ आणि ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे’ अशी आळवणी भगवंतापुढे करु लागले.
प्रभात फिल्म्सच्या ‘गोकुळ’ या हिंदी चित्रपटातून आणि ‘रूख्मिणी स्वयंवर’ या मराठी चित्रपटातून त्यांना संगीतकार म्हणून मिळालेली संधी आणि पुढे घडलेला इतिहास आता महाराष्ट्राच्या सुरेल संगीताच्या इतिहासाचा एक भाग झाला आहे ‘गोकुळ’ची गाणी बाबूजींच्या आधी हुस्नलाल भगतराम करणार होते. परंतु नियतीच्या मनात त्याक्षणी कदाचित भूप रागाचे सूर छेडले जात असणार. नियतीनं तिथं हुस्नलाल भगतराम यांच्या ऐवजी बाबूजींना संधी दिली. २२ चित्रपटांना संगीत देऊनही सुधीर फडके यांची हिंदीमधली कारकीर्द म्हणावं तशी बहरली नाही, मात्र भूप रागात बांधलेलं, ‘भाभी की चुडियां’ मधलं ‘ज्योतीकलश छलके’ हे एकच गाणं सुद्धा ‘दीर्घ कारकीर्द’ म्हणावं एवढं अप्रतिम आणि अवीट गोडीचं आहे. सतार, बासरीचे सुरुवातीचे सुंदर तुकडे, पाठोपाठ येणारा लताचा स्वर, पं नरेंद्र शर्मांचे शब्द आणि बाबूजींचं संगीत म्हणजे सहस्रश्मी सूर्याचं आजवर जगात कुणीही केलं नसेल असं पवित्र स्वागत आहे. बाबूजींचं हिंदीतलं सुरवातीचं संगीत बरंचसं पंजाबी धाटणीचं होतं, हळू हळू त्यांनी त्यांचं मराठीपण संगीतात आणलं. १९५१ साली ‘मालती माधव’ मध्ये पहिल्यांदाच खरे बाबूजी दिसले. या चित्रपटामधलं ‘बांधे प्रीती फूलडोर’ हे गाणं १९५२ साली लता मंगेशकरांनी कलकत्ता संगीत महोत्सवात बडे गुलाम अली खाँ समोर सादर केलं तेव्हा ती रचना ऐकून तेही थक्क झाले होते.
मराठीत ८४ चित्रपटांसाठी त्यांनी संगीतबद्ध केलेली ८७७ गाणी आणि चित्रपट व गीतरामायण धरुन गायलेली ५११ गाणी ही ‘शांत शांत उत्तर रात्री, मंद मंद तारे’ असताना अलगद आपल्या बाजूला येऊन बसतात आणि हात हातात घेऊन जणू आपली ख्याली खुशाली विचारतात. मंगेश पाडगावकर म्हणतात, ‘सुधीर फडकेंनी खरं तर माझी फक्त चार गाणी गायली आहेत. ‘कधी बहर, कधी शिशिर’, ‘अशी पाखरे येती’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’ आणि ‘तुझे गीत गाण्यासाठी.’ परंतु या चारच गाण्यांचा प्रभाव एवढा आहे की अनेक जण मला ‘तुमची बहुतेक गाणी फडक्यांनी गायली आहेत ना?’ असं विचारत.
गदिमा उर्फ ग दि माडगूळकर यांच्या बाबतीत मात्र तेच सत्य आहे. बाबूजी आणि गदिमा ही दोन्ही नावं आपल्याला एकाच श्वासात घ्यावी लागतात. १९४० साली कोल्हापूरला झालेल्या प्रांतिक साहित्य संमेलनात बाबूजींनी गदिमांच्या कविता गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्या ऐकून साक्षात गोविंदराव टेंबे यांनी बाबूजींची पाठ थोपटली होती. ती बहुधा या दोघांच्या सहप्रवासाची नांदी होती. बाबूजी-गदिमा यांनी एकत्रपणे संग केलेल्या ३३२ गाण्यांची यादी दिली तर ती सलग वाचता येणं शक्य नाही, कारण गाणी वाचता वाचता आपण ती गुणगुणू लागतो आणि पुढे वाचायचं राहून जातं. पाहिजे तर स्वतः खात्री करुन घ्या..बाई मी विकत घेतला श्याम, नाचनाचूनि अती मी दमले, एक धागा सुखाचा, सांग तू माझा होशील का, का रे दुरावा का रे अबोला, या सुखांनो या, उद्धवा अजब तुझे सरकार, उठ पंढरीच्या राजा, घननीळा लडीवाळा, जग हे बंदिशाळा, देव देव्हाऱ्यात नाही...!
दिग्दर्शक राजा परांजपे, गीतकार गदिमा आणि संगीतकार बाबूजी यांनी आपल्यासाठी सुखाच्या शतधाग्यांनी स्वर्गीय शब्द-सुरांचे जरतारी वस्त्र विणले. ‘जगाच्या पाठीवर’ पासून त्यांचे जे अधिराज्य सुरु झाले त्यात या दोघांनी रचनांचे असंख्य अनोखे प्रयोग केले. उदाहरणार्थ ‘नाही खर्चिली कवडी दमडी’ या गाण्याचे शब्द गदिमांनी संत मीराबाईच्या ‘मैने गोविंद लिनो मोल’ या भजनावर बेतले होते तर संत सूरदासांच्या ‘अब मैं नाचो बहोत गोपाल’ या भजनाचे स्वैर मराठी रूप त्यांनी ‘नाच नाचूनि अती मी दमले’ या गाण्यात अचूक पकडले होते. बाबूजींनी या दोन्ही गाण्यांत कमाल केली आहे. ‘विकत घेतला श्याम’ मध्ये तर बाबूजींचा स्वर आणि संगीत, आशा भोसले यांचा स्वर, बाबूजींचे सहायक श्यामराव कांबळे यांनी वाजवलेली हार्मोनियम असा चौफेर संगम आहे.
‘गीत रामायण’ हा केवळ या दोघांच्या एकत्र प्रवासाचाच कळस नव्हे तर मराठी भावसंगीतातलाच तो कंठमणी आहे. आपण सुदैवी म्हणून गीत रामायण मराठीत निर्माण झाले. त्यातील ५६ गाण्यांसाठी आपण पुढील ५६ युगे बाबूजी आणि गदिमांच्या ऋणात राहू. ‘मधुघट’ या पुस्तकात मधुसूदन कालेलकरांनी माडगुळकरांवर एक लेख लिहिलेला आहे. त्यात सांगितलेल्या प्रसंगातून बाबूजी आणि अण्णा यांच्यातील आंतरिक नाते कसे होते ते आपल्या लक्षात येते. कालेलकर लिहितात- एकदा निर्माते शरद पिळगांवकर यांच्या घरी बैठक झाली. मी, अण्णा, मो. ग. रांगणेकर आणि पिळगांवकर आम्ही चौघे होतो थोड्या वेळानं दारावरची बेल वाजली, दार उघडून पाहतो तो बाबूजी उर्फ सुधीर फडके. त्या काळात फडके-माडगूळकरांमधून विस्तव जात नव्हता, त्यामुळे आता काय होणार या कल्पनेनं मी आणि पिळगांवकर घाबरून गेलो. पण काहीच झालं नाही या अविर्भावात अण्णांनी फडक्यांशी बोलायला सुरूवात केली. बोलता, बोलता 'गीत रामायणा’ तील एका गाण्याचा कागद हरवला होता त्याचा विषय निघाला. वादाला सुरुवात झाली. बाबूजी म्हणाले “हे सारं तुमच्यामुळे घडलं अण्णा. माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो.” यावर माडगूळकर उठले आणि म्हणाले, “सुधीर, असल्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुझ्या मुलाची शपथ घेऊ नकोस. तुझा मुलगा मला माझ्या मुलासारखा आहे. पुन्हा कधी अशी शपथ देऊ नकोस.” हे बोलताना अण्णांचा स्वर कापरा झाला होता, डोळे अश्रूंनी भरून आले होते.’
बाबूजींनी त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्राचा एकच भाग लिहिला, दुसराही त्यांना लिहिता आला असता तर अनेक गाण्यांच्या निर्मितीचे क्षण आपल्याला अनुभवता आले असते. त्या पुस्तकात जरी ते लिहायचं राहून गेलं असलं तरी दादरमधील बाबूजींच्या विविध घरांच्या भिंती मात्र त्याच्या मूक साक्षीदार आहेत. सुरवातीला बाबूजी दादरला अल्ट्रा सोसायटीत आशा भोसले यांच्या घरी गाण्यांच्या रिहर्सलला यायचे. पुढे १९५३ मध्ये ते पहिल्यांदा दादरला राहायला आले ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क रस्ता क्रमांक ५ वरील अंबा सदनमध्ये. तिथे चार वर्षे राहून ते वर्ष दीड वर्ष आताच्या प्रीतम हॉटेलनजिक जयेंद्र महाल या इमारतीत राहात होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या ओढीनं ते पुन्हा परतले ते रस्ता क्रमांक ३ वरील ‘१२ शंकर निवास’ मध्ये. ‘१३ शंकर निवास’ मध्ये गदिमा राहायचे. बाबूजींच्या शंकर निवासमधील घरातच ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुहासिनी’, ‘भाभी की चुडियां’ अशा अनेक चित्रपटांमधली गाणी जन्माला आली. बाबूजींचे परम दैवत असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या शेकडो चर्चाही इथेच झाल्या. ‘देवघरातील समईमधूनी, अजून जळती वाती’ तसे बाबूजी त्यांच्या गाण्यांमधून आजही भेटत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसराला संपन्न करणाऱ्या अशा या सूरश्रीमंत प्रतिभावंताला, गेली पस्तीसहून अधिक वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आणि अग्रेसर असलेल्या सुगी डेव्हलपर्स यांच्या सुगी परिवारातर्फे मानाचा मुजरा. बाबूजींच्या स्वरांच बांधकाम जस अपार आकर्षक, संग पक्क आणि दीर्घजीवी आहे तसच आमच्या घरांच बांधकामही आहे, असा ग्राहकांचा विश्वास आम्ही कमावला आहे, तो या सांस्कृतिक संस्कारांमधूनच.
Comments